पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.१३: ‘मार्मिक’च्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संबोधित केले. ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला.

“आपण पुन्हा गुलामगिरीकडे जातोय का?”

“आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही ते म्हणाले. “व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, की देश पुन्हा गुलामगिरीकडे जात असेल, तर तुम्ही त्यावर तुमच्या ब्रशचे फटकारे मारलेच पाहिजेत”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नमूद केलं.

उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. हुकूमशाहाला आव्हान देऊन हुकूमशाही नष्ट करण्याची ताकद व्यंगचित्रकारामध्ये असते असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली आजच्या काळाशी सुसंगत असलेली काही व्यंगचित्र मुद्दाम दाखवली. उद्धव ठाकरेंनी या व्यंगचित्रांमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसंच भाजपामध्ये नुकतंच झालेल्या खांदेपालटाच्या मुद्द्याला स्पर्श करत उद्धव ठाकरेंनी बावन असो किंवा मग एकशे बावन्न असो, तुमची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही, असं म्हणत भाजपाला जोरदार टोला लगावला. 

अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. व्यंगचित्रकारांच्या फटकाऱ्यांमधून समाजाला आणि देशाला दिशा मिळत आली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरही टीका केली. 

“हर घर तिरंगा लावा, पण ज्यांच्याकडे घरच नाही तो तिरंगा लावणार कुठे? नुसतं बेंबीच्या देठापासून भारत माता की जय ओरडून चीन मागे जाणार आहे का? घराघरावर तिरंगा लावाच, पण तुमच्या हृदयात देखील तिरंगा हवा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी रेखाटलेलं एक व्यंगचित्र देखील उदाहरणादाखल सादर केलं. व्यंगचित्रात एक मुलगा त्याच्याकडे तिरंगा आहे, पण तो लावण्यासाठी घर नाही असं दाखवण्यात आलं होतं.  

“मंत्री आहेत कुठे?”

दरम्यान, राज्यात अद्याप खातेवाटप न झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केला आहे. “राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज आझाद आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here