मुंबई,दि.२५: दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिवसेनेत उभी फूट पडली. एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असे २ गट निर्माण झाले. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं म्हणत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. शिंदे-ठाकरे यांच्या संघर्षाच्या लढाईत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर पक्ष संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभं राहिले.
राज्यातील या राजकीय घडामोडीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रखर मुलाखत शिवसेना पॉडकास्टवर खासदार संजय राऊत घेत आहेत. या मुलाखतीचा एक टिझर प्रसिद्ध झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खुले चॅलेंज दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे हा एक व्यक्ती नसून बाळासाहेबांचा विचार आहे. मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर जरूर संपवा, मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची साथसोबत आणि तुमची ताकद बघू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
तसेच या मुलाखतीत संजय राऊतांनी वर्षभरापूर्वी तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले असं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी वाहून गेले नाही, तर खेकड्यांनी धरण फोडले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला. उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून तुम्ही शिवसेना फोडली मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडली? असा सवालही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना करत उठसूठ दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, लोकशाही साधा माणूस वाचवणार आहे. बाबरीवेळी तुम्ही जबाबदारी घेतली नाही. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचे श्रेय तुम्ही कसे घेऊ शकता? देशावर प्रेम करणारा, देशासाठी मरायला तयार आहे तो माझ्यासाठी हिंदू, माझा देश माझा परिवार आहे. हे माझे हिंदुत्व आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. येत्या २६ आणि २७ जुलै रोजी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.