मुंबई,दि.३: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवलं. जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो, पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडाला पाठबळ देत भाजपाने शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. त्यानंतर शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ, खासदार आणि आजी-माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटात दाखल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घराणेशाहीमुळे शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष संपत जातील आणि एकटा भाजपा उरेल, असे विधान केले होते.
नड्डा यांच्या या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असं म्हटलंय. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“दोन ते तीन पातळीवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.