मुंबई,दि.21: Uday Samant Sharad Pawar: राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते (शिंदे गट) उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट झाली. गेल्या काही दिवसांत उदय सामंत तिसऱ्यांदा शरद पवार यांना भेटले आहेत. दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने ही भेट झाल्याची माहिती उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली.
काय म्हणाले उदय सामंत? Uday Samant Sharad Pawar
“राजकारणाच्या पलिकडेही काही गोष्टी असतात. अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. दोन जिल्ह्यातील निकाल जाहीर होणं अद्याप बाकी आहे. शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहे, प्रमुख आहेत. त्यांना या निवडणुकीची माहिती देण्यासाठी आम्ही गेलो होतो. निवडून आलेले सदस्य देखील माझ्यासोबत होते. यापलिकडे दुसरा कोणताही राजकीय विषय किंवा हेतू नव्हता. ज्या व्यक्तीने ही संस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, ज्या व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली ही संस्था चालते त्या संस्थेच्या निवडणुकीत नेमकं काय झालंय हे विश्वस्त म्हणून सांगणं ही माझी जबाबदारी आहे. त्या संस्थेत मी देखील विश्वस्त आहे. या नात्यानेच तहहयात विश्वस्त शरद पवार असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
माझ्यासोबत पाच सहा निवडून आलेले सदस्य होते… | Uday Samant
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरले आहेत. शरद पवार यांच्या भेटीत अजित पवारांबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “माझ्यासोबत पाच सहा निवडून आलेले सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय चर्चा होऊ शकणार नाही. सध्या मी त्यांना भेटलो याचा अर्थ राजकीय मुव्हमेंट आम्ही करतोय, असा होत नाही.”
नाट्य परिषदेवर अध्यक्ष कोण?
“शरद पवार हे तहहयात विश्वस्त आहेत, मी विश्वस्त आहे. त्यामुळे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी कोण असावा हे विश्वस्तांनी यात पडण्यात अर्थ नाही. या निवडणुकीशी आमचा संबंध नाही. बहुमताने निवडणूक आलेले सदस्य याबाबत निर्णय घेतील. 19 कार्यकारिणी सदस्य होती, ही कार्यकारिणी अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक कार्यवाहक, खजिनदान आणि दोन सहकार्यवाहक नेमायचे आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्त्व असावं, हा आमचा आग्रह राहणार आहे. प्रशांत दामले यांच्यासह आणखी एक दोन जण इच्छुक आहेत,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.