लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केले स्वीकृत नगरसेवक

0

मुंबई,दि.१०: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे. भाजपने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत बदलापूर येथील वादग्रस्त शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली आहे. बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले एका नामांकित शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने आज थेट स्वीकृत नगरसेवक केले.

कथित सहआरोपी आपटे हे न्यायालयीन जामिनावर बाहेर आहेत. बदलापूरच्या नामांकित शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये दोन चिमुरडय़ांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद अवघ्या देशात उमटले होते. या प्रकरणातील मुख्य आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

हे प्रकरण दडपणारे शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाल आणि आपटे फरार झाले होते. ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने तब्बल ३५ दिवसानंतर कर्जतच्या फार्म हाऊसमधून त्यांना अटक केली होती.

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आपटे व कोतवाल यांच्यावर खटला सुरू आहे. बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असतांनाही भाजपने तुषार आपटे यांना बदलापूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केल्याने बदलापूरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या संचालकांनी पिडीत मुलीची तक्रार नोंद होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला होता. नंतर ते फरार झाले, आम्हाला वाटलं होत की ते अजूनही जेल मध्ये आहेत. मात्र आता त्यांना मोठं स्थान दिले आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी दबा आणला होता भाजपाच्या माध्यमातून की अल्पवयीन मुलीची आणि तिच्या पालकांची तक्रारही घेऊ नये. शाळेचे संचालक फरार झाले. मग ते ठरवून शरण आले. आमच्या माध्यमातून कळतंय की रविंद्र चव्हाण त्यांना पालिकेच्या सभागृहात घोड्यावर बसून घेऊन चालले आहेत. काय चाललंय महाराष्ट्रात? असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here