एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी

2

दि.8: देशातील शेती आणखी प्रगत आणि उत्पादनशील व्हावी, यासाठी शेती अभ्यासक व संशोधक नवनवीन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विशेषत: भारतीय कृषी संशोधन परिषदेतील शास्त्रज्ञ कायम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नात असतात. वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी अशीच एक अनोखी गोष्ट विकसित केली आहे. कलम (Grafting) तंत्राद्वारे शास्त्रज्ञांनी अशी वनस्पती विकसित केली आहे, ज्याला एकाचं वेळी टोमॅटो आणि वांगी लागतील. त्यांनी या वनस्पतीला ‘ब्रिमॅटो’ (Brimato) असं नाव दिलं आहे.

वाराणसीतील आयसीएआर आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेनं यापूर्वी ग्राफ्टिंग पोमॅटो (बटाटा-टोमॅटो) चं एकत्र उत्पादन घेण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर, त्यांनी आता ‘ब्रिमॅटो’ची झाडं विकसित केली आहेत. आयसीएआरनं दिलेल्या निवेदनानुसार, 25 ते 30 दिवसांची वांग्याची रोपं आणि 22 ते 25 दिवसांची टोमॅटोची रोपं यांचं ग्राफ्टिंग करून ब्रिमॅटो ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. ‘IC 111056’ या वांग्याच्या वाणातील सुमारे 5 टक्के रोपांमध्ये दोन शाखा विकसित करण्याची प्रवृत्ती आहे. याचाच फायदा घेऊन स्प्लिस पद्धतीनं कलम केलं गेलं. मूळ वांगांच्या झाडाला तिरपा छेद देऊन (45 अंशाच्या कोनात) त्यात टोमॅटोची फांदी बांधून ग्राफ्टिंग केल्यानंतर (Grafting Technique) रोपांना 5 ते 7 दिवस नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आलं. नंतर 5 ते 7 दिवस त्यांना समप्रमाणात सूर्यप्रकाश आणि सावली दिली गेली.

वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चमधील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम केलेल्या वनस्पतींचं ग्राफ्टिंग 15 ते 18 दिवसांनी शेतात लावण्यात आलं. वांगी (Brinjals) आणि टोमॅटोची (Tomato) संतुलित वाढ व्हावी यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात जास्त काळजी घेण्यात आली. शास्त्रज्ञांनी गरजेनुसार रोपाला खत दिलं. लावणीनंतर 60 ते 70 दिवसांनी एकाचं झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली. ब्रिमॅटोच्या एका झाडापासून 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांग्याचं उत्पादन मिळालं, अशी माहिती या शास्रज्ञांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून भाज्यांची आणि फळांची उत्पादकता वाढवण्यासाठी ग्राफ्टिंगचा वापर केला जातो. भारतीयांसाठी एक तंत्र एकदम नवीन नाही. परंतु एकाचं झाडाला दोन भाज्यांचं ग्राफ्टिंग करण्याची पद्धत अगदी अलीकडच्या काळात विकसित करण्यात आली आहे. जेणेकरून एकाच वनस्पतीपासून दोन वेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल. ग्राफ्टिंग तंत्रानं तयार केलेली वनस्पती कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) देण्यात सक्षम आहे.


2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here