लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले हे आदेश

0

सोलापूर,दि.15: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रामाणिकरण व संशयित पेड न्यूज बाबत अत्यंत काटेकोरपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने माध्यम कक्ष व जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे, याच कार्यालयाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन माध्यम कक्ष व सनियंत्रण समितीचा कामकाजाच्या आढावा प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी माध्यम कक्ष नोडल अधिकारी, सदस्य सचिव सुनील सोनटक्के,  क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा समिती सदस्य अंकुश चव्हाण, प्रचार सहाय्यक अंबादास यादव, जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी रफिक शेख, समाज माध्यम तज्ञ तथा समिती सदस्य श्रीराम राऊत, आप्पा सरवळे, धुळाप्पा जोकर, सचिन सोनवणे, कासीम जमादार, सुभाष भोपळे, आर. बी. तारवले, मिलिंद भिंगारे, दिलीप कोकाटे, शरद नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, निवडणुकीमध्ये माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. माध्यम कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीची सर्व माहिती प्रसारमाध्यमांना वेळेत व व्यवस्थितपणे गेली पाहिजे. तर समितीच्या माध्यमातून निवडणूक कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्ष उमेदवार व अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या माध्यमावर लक्ष ठेवणे, संशयित पेडन्यूजची प्रकरण शोधून काढणे व राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे काम महत्त्वाचे आहे. यासाठी सर्व समिती सदस्य व नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यम कक्षाची पाहणी करून इलेक्ट्रॉनिक, प्रिंट व सोशल मीडियावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे याबाबतच्या स्थापन केलेल्या सर्व युनिटची पाहणी केली, तसेच आवश्यक ते बदल करण्याबाबत सूचित केले. एक ही संशियत पेड न्यूज चे प्रकरण समितीच्या नियंत्रणातून दुर्लक्षित राहणार नाही यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभा करून ती अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने माध्यम कक्ष व जिल्हास्तरीय माध्यम प्रमानीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच या अंतर्गत संशयित पेड न्यूजची प्रकरणे तसेच जाहिरातीचे पूर्व प्रामाणिकरण करण्यासाठी उभा करण्यात आलेल्या यंत्रणेविषयी सांगून यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टीम विषयी सविस्तर माहिती दिली.

विविध नोडल अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा

येथील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन प्रत्येक नोडल अधिकारी व त्यांच्या अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी निवडणुकीचे कामकाज अत्यंत काटेकोरपणे करावे असे निर्देश देऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करावेत व नियुक्त करण्यात आलेला सर्व स्टाफ दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल याबाबतची खबरदारी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लोकसभा निवडणूक 2024 साठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी नियोजन भवन येथील स्मार्ट सिटी कार्यालयाची तसेच समिती सभागृहाची पाहणी करून नियंत्रण कक्ष उभारण्याबाबत आवश्यक ते निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष प्रमुख मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी वाकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुख तथा महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here