या मशिनमुळे आता प्राण्यांमधून माणसांमध्ये व्हायरस पसरण्याआधीच त्याची माहिती मिळणार

0

दि.2 : कोरोनाने जगभर अनेकांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार प्राण्यापासून मनुष्याला झाल्याचे सांगितले जाते. कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. एक अत्यंत दिलासादायक बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. संशोधकांनी एक मशीन तयार केलं आहे, ज्यामुळे कोणताच व्हायरस कोरोनासारखा थैमान घालू शकणार नाही.

कोरोनाचा विषाणू वटवाघळांपासून माणसांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत अद्यापही शोध सुरू आहे. कोरोनासारखे असेच बरेच व्हायरस आहेत, जे प्राण्यांमधून माणसांमध्ये येतात आणि मग ते मोठ्या प्रमाणात पसरतात आणि महासाथीचं रूप घेतात. पण आता प्राण्यांमधून माणसांमध्ये व्हायरस पसरण्याआधीच त्याची माहिती मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, कोरोनासारखा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरण्यापूर्वीच शोधला जाऊ शकतो आणि साथीत रूपांतर होण्यापूर्वीच तो रोखता येऊ शकतो, असं एका संशोधनात सिद्ध झालं आहे.

स्कॉटलंडमधल्या (Scotland) ग्लासगो विद्यापीठातले (University of Glasgow) नारदस मोलेन्त्झे (Nardus Mollentze), सायमन बाबयान आणि डॅनियल स्ट्रीकर या तीन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असा दावा केला आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून कोरोनासारखा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरण्यापूर्वी शोधला जाऊ शकतो आणि साथीत रूपांतर होण्यापूर्वीच त्याला रोखता येऊ शकतं. कोरोनाप्रमाणेच प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरणाऱ्या विषाणूमुळे अनेक नवीन रोग होत आहेत. योग्य जेनेटिक मटेरियल (Genetic Material) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज उपकरणांच्या मदतीनं विषाणूचा संसर्ग पसरण्यापूर्वीच त्याचा शोध घेतला जाऊ शकतो आणि त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असा दावा संशोधकांनी केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विषाणूची चाचणी घेण्याची शक्यता शोधण्याबाबत पूर्वी लिव्हरपूल विद्यापीठात एक संशोधन करण्यात आलं होतं त्याचाही ग्लासगोच्या शास्त्रज्ञांना फायदा झाला. तसंच पीएलओएस बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की प्राण्यांमधल्या सुमारे 16 लाख विषाणूंपैकी फक्त काहीच संसर्गजन्य आहेत, जे प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, विषाणूंच्या जेनेटिक सिक्वेन्सची (Genetic Sequence) तपासणी करून या विषाणूचा जनावरांमधून माणसांमध्ये फैलाव होऊ शकतो की नाही हे जाणून घेता येते. 2019 साली चीनमधल्या वुहान येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असता, तर कदाचित तेव्हाच कोरोनाचा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो किंवा नाही, हे कळलं असतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here