दि.2: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळल्यानंतर अनेक देशात कठोर पावले उचलली जात आहेत. अनेक देशात खळबळ माजली आहे. ‘ओमिक्रॉन’नं जगभरात दहशत पसरवली असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक खुशखबर देण्यात आलीय. WHO नं दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये अत्यंत ‘हलकी’ किंवा अगदी अस्पष्ट लक्षणं दिसून येत आहेत. तसंच सध्या वापरात असलेल्या वेगवेगळ्या लसींचाही ‘ओमिक्रॉन’पासून वाचण्यासाठी आणि मृत्यूपासून दूर राहण्यासाठी बराचसा फायदा होऊ शकतो, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या दाव्यावर काही प्रश्नचिन्हंही उपस्थित करण्यात येत आहेत. सोबतच, जेव्हापर्यंत ‘ओमिक्रॉन’ची पूर्ण स्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत काळजी घेणं हाच उपाय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘ओमिक्रॉन’मुळे अद्याप एकही मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही.
WHO च्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ (भारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेलं स्वरुप) प्रकारापेक्षा कोरोनाचं ‘ओमिक्रॉन’ स्वरुप अधिक लोकांना संक्रमित करत आहे. कोरोना लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तीही कोरोनाच्या या स्वरुपापासून वाचू शकत नाहीत.
WHO चा दावा कोणत्या आधारावर?
‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट ‘डेल्टा’ व्हेरियंटप्रमाणे जगासाठी धोकादायक ठरणार नाही कहर करणार नाही, असा दावा WHO अधिकृतरित्या केला आहे. मात्र, सध्या वापरात असलेल्या लसी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूंची संख्या कमी राखण्यात प्रभावी ठरू शकेल का? याबाबत अद्याप स्पष्ट चित्रं नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेला दावा कोणत्या आधारावर करण्यात आला आहे हे स्पष्ट झालेलं नाही, असं WHO च्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलंय.