मला बोलवताना दहावेळा विचार करा मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन: अजित पवार

0

पुणे,दि.२७: मला बोलवताना दहावेळा विचार करा मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी तेथील सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. अजित पवारांनी राजकारणात येण्यापूर्वी शेती आणि दूध उत्पादक म्हणून काम केल्याचं अनेकवेळा भाषणातून सांगितलं आहे. आज त्याची प्रचिती येथील अधिकारी वर्गाला पाहण्यास मिळाली.

अजित पवार कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच तडक एका गोठ्याजवळ गेले. तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून “आरे काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढं लागत (निधी) आहे, पुरवण्या मागण्यांमध्ये करून देतो. तुम्ही अधिकार्‍यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काटेवाडीचा आणि बारामतीचादेखील गोठा येऊन पहा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही,” असं म्हणत अजित पवारांनी अधिकारी वर्गाची कानउघाडणी केली.

मागील चाळीस वर्षांपासून मुरघास प्रकल्प यंत्रावर चारा कापण्याचं काम करणाऱ्या छबूबाई कामठे यांच्यासह अन्य तीन महिला या प्रदर्शनाच्या ठिकाणी होत्या. त्या सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या प्रकल्पाजवळ उभ्या होत्या. अजित पवार त्यांच्या प्रकल्पाजवळ आल्यावर तेथील महिलांनी फोटोचा आग्रह धरला. त्यावर अजित पवार कुठल्या तुम्ही, आज एकदम नटून थटून आलात, हातावर मेहंदी पण काढली असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार यांच्या बाजूला असलेल्या छबूबाई कामठे म्हणल्या, “दादा मी सासवड येथील असून ४० वर्षापासून काम करते आणि मला ४० हजार पगार आहे. यानंतर अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील स्टॉलकडे गेले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here