एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे: मनोज जरांगे पाटील

0

परभणी,दि.26: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. अॅम्बुलन्समधून येत मनोज जरांगे यांनी मतदान केले. दोन दिवसांपूर्वी जरांगे यांना प्रकृती खालावल्याने बीडहून छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत शेकडो अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली होती. नंतर प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार देण्याची तयारी करण्यात आली होती.

मात्र मराठा समाजाने एकही उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना प्रस्ताव दिला होता, मात्र तो प्रस्ताव नाकारण्यात आला. मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही सारखेच आहेत. यामुळे कोणालाही पाठिंबा देणार नाही असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

हेही वाचा वार फिरलय कारण या गावात कुणाला मतदान करायचं ते ठरलयं

धाकधुक वाढविणारी घोषणा

मनोज जरांगे यांनी राज्यातील आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे. लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देणार आहोत. आता कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, असे जरांगे यांनी जाहीर केले. 

एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे

मनोज जरांगे यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला. समाजाला आवाहन करतो की, मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावे. एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. जो उमेदवार सगे सोयऱ्यांच्या बाजुचा आहे त्याला मतदान करावे, असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना बरोबर माहितीय की कोणाला मतदान करावे. आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा, असेही जरांगे यांनी सुचविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here