नागपूर,दि.२९: Maharashtra Politics: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संघ विचारांचा रेशीम कीडा हा पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्या मनात आणि कानात वळवळत होता. त्यामुळे त्यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट दिली असावी. यामध्ये काहीही चूक नाही. उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पँट घालून आले तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संघ विचारांचा रेशीम कीडा… | Maharashtra Politics
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. हेडगेवारांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यासंदर्भात बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक टोले लगावले. संघ विचारांचा रेशीम कीडा फार पहिल्यापासून एकनाथ शिंदेच्या मनात वळवळत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही हिंदुत्त्वादी विचारांची संघटना आहे. त्यामुळे आम्ही कधीही संघावर टीका केलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी ‘पक्षांतर’ केलं होतं, पण इतक्या लवकर त्यांचे ‘रक्तांतर’ होईल, असे वाटले नव्हते, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
शिंदे यांना सावधानतेचा इशारा | Maharashtra News
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशाराही दिला. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालयात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली. या सगळ्याची सूत्रे मुख्यमंत्री कार्यालयातून हलवत असतील तर त्यांनी सावधपणे पावले टाकावीत. एक दिवस भाजपवाले तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात कधी घुसतील हे तुम्हाला कळणारही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच राऊत यांनी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यासंदर्भतही भाष्य केले. हेच नरेश म्हस्के मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन यायचे. शिंद्यांना आवरा, असे ते सांगायचे. एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी म्हस्के यांच्याकडून यायच्या, असेही संजय राऊत यांनी सांगितले.