सोलापूर,दि.28: स्वप्नात येऊन मला त्रास देतो म्हणत पोलिसाने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे विचित्र प्रकरण उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात घडले आहे. सोशल मीडियावर पोलीसाने एका दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक हवालदार दुकानदाराला चापट मारताना दिसत आहे. मारहाणीचे कारण विचारले असता हवालदार सांगतो की, तो मुलगा स्वप्नात येतो. त्याला त्रास देतो. त्यामुळे तो शांतपणे झोपू शकत नाही, खाऊ-पिऊ शकत नाही. हा व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आरोपी हवालदाराला निलंबित केले आहे.
आयुष मोदनवाल यांचे विंध्याचल पोलीस स्टेशन हद्दीतील अमरावती चौकात दुकान आहे. त्यांच्या आईसोबत हे दुकान चालवतात. विंध्याचल पोलीस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल रामविलास पासवान त्यांच्या दुकानात आले. त्यांना बाहेर बोलावून काहीही न सांगता चापट मारायला सुरुवात केली. दुकानदाराने त्यांना कारण विचारल्यावर ते म्हणाले, “तू माझ्या स्वप्नात येऊन मला त्रास देतोस. तुमच्यामुळे मला नीट झोप येत नाही.” कॉन्स्टेबलचे बोलणे ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले.
एवढेच नाही तर आरोपी हवालदाराने दुकानदाराला पुन्हा स्वप्नात आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन लॉकअपमध्ये बंद करण्यात येईल असे सांगितले. ही विचित्र घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित आयुषने सीसीटीव्ही फुटेजसह आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी विंध्याचल पोलिस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल रामविलास पासवान यांना दुकानदाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.