“कायदा माझ्या बापाने लिहिला आहे” गुन्हा दाखल झाल्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.१२: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत (Vinayak Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), सुषमा अंधारेंसह (Sushma Andhare) सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी कायद्याची भाषा केली आहे.

ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा पार पडला. या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन केली. अन्य नेत्यांबद्दलही अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

राज ठाकरेंनी जास्त नकला केल्या

यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं, “जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत.”

कायदा माझ्या बापाने लिहिला आहे

“मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईन. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल,” असेही अंधारे यांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here