आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार : अजित पवार

0

पुणे,दि.8: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने छापे मारले. त्यात त्यांच्या बहिणींच्या घरावर छापे मारले याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकवर विभागाने छापा मारला होता अशी माहिती समोर आली आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असेदेखील अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची आयकर विभागमार्फत सुरु असलेल्या चौकशीवर भाष्य केले. “आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार आयकर विभाग तसेच अधिकाऱ्यांना मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” असे अजित पवार म्हणाले.

तसेच मी कधीही कर चुकवेगिरी करत नाही असे अजित पवार यांनी निक्षून सांगितले. कर कसा चुकवता येणार नाही, यासाठी मी अधिकाऱ्यांशी बोलत असतो. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांसहित सर्व कंपन्यांनी कर भरला पाहिजे या मताचा मी आहे. आर्थिक शिस्त कोणी मोडू नये, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here