राज ठाकरेंच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्यानी घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.5: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला जाहीर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज ठाकरेंनी भाषणात मस्जिद व मदरशाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले होते. मस्जिदीवरील भोंगे काढावी लागतील नाहीतर, आम्हीही हनुमान चालीसा लाऊड स्पीकरवर लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. त्यातच पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने मनसे पक्षाला राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवले आहे. यावर पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्यासंबंधी बोलताना सांगितले की, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैसमज करुन देतात त्यातून हे झालं असावं. पण यातून मार्ग निघेल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी कोणत्याही प्रार्थनेला विरोध केलेला नाही, ती कऱण्याचा प्रत्येकाला हक्क असून त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये असं स्पष्ट सांगितलं होतं. जर लोक त्याची काळजी घेणार असतील तर आमचं काहीच म्हणणं नाही, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

मुस्लिम पदाधिकारी काय म्हणाला

मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात – धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here