ATM मशीनचे क्लोनिंग करून अनेकांच्या खात्यातून काढली रक्कम

0

यवतमाळ,दि.13:ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आता तर ATM मधून अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढल्याची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळमध्ये एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून अनेकांचे पैसे हडपल्याची घटना समोर आली आहे. (ATM Card Cloning) बिहारचे रहिवासी असलेल्या दोन आरोपींनी यवतमाळमध्ये येऊन एटीएममधून क्लोनिंग करून ग्राहकांचे पैसे हडपले. या दोघांनी एटीएममशीनमध्ये इंटर्नल डिव्हाईस लाऊन ग्राहकांचे पैसे उकळले. याची तक्रार सायबर सेलकडे करताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • ATMमध्ये प्रवेश केल्यानंतर तु्म्ही कुठे स्कॅनरला लावला आहे का, ते प्रथम पाहा
  • ATM पिन नंबर टाकताना कुणाला दाखवू नका.
  • ATM ऐवजी पैसे काढण्यासाठी मॉबाईल ॲपचा वापर करा
  • ज्या बॅँकेचे खाते आहे, त्याच बॅंकेच्या ATMमधून पैसे काढा
  • काय आहे हा प्रकार?

गेल्या महिन्यात यवतमाळमधील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमधून अनेकांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास होत असल्याच्या घटना पुढे आल्या. आणि एकच खळबळ उडाली. अशा 21 तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर सायबर सेलने तपास सुरु केला. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ग्राहक गेला नसताना देखील त्याच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याने ग्राहकांमध्ये देखील घबराट निर्माण झाली.

याप्रकरणी यवतमाळ पोलिसांच्या सायबर सेलने तपासणी केली असता एटीएमच्या आतील डिव्हाईसला इंटर्नल स्कॅनर लाऊन क्लोन केल्याची बाब पुढे आली. त्याद्वारे आरोपींनी अनेकांचे लाखो रुपये हडपले. सायबर सेल आणि एलसीबीने याप्रकरणी तपासाची चक्रे फिरविली त्यात बिहार राज्यातील सुकेशकुमार अनिल सिंह आणि सुधीरकुमार निर्मल पांडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

ज्या एटीएम सेंटरमध्ये दोन मशीन आहे, अशा सेंटरची निवड करून त्यातील एक मशीन आरोपी व्यस्त ठेवायचे आणि बाजूच्या मशीनवर आलेल्या ग्राहकाच्या हात आणि खांद्याच्या हालचालीवरून अथवा बारीक लक्ष ठेऊन पासवर्ड मिळवायचे दुसरीकडे त्या एटीएम मशीनममध्ये इंटर्नल स्कॅनर बसवून एटीएम कार्ड क्लोन केल्या जायचे. त्यानंतर क्लोन केलेल्या कार्डातून पासवर्ड द्वारे कुठल्याही एटीएममधून रक्कम काढल्या जायची.

हे आरोपी महाराष्ट्रात तीन वेळा आले. त्यात दोनवेळा ते यवतमाळमध्ये देखील आले असल्याचे पुढे आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी एक इंटरर्नल एटीएम स्कॅनर, एक हॅन्ड एटीएम स्कॅनर, एक बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, 15 एटीएम कार्ड, आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 28 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या आरोपींनी अनेक राज्यात अशाच पद्धतीने पैसे हडपले असून एका आरोपीवर उत्तरप्रदेशात गुन्हा देखील दाखल आहे. त्यामुळे एटीएममध्ये व्यवहार करताना आपला पासवर्ड कुणाला मिळू नये, एटीएम मशीनला क्लोनिंग स्कॅनर तर लावले नाही ना याची अवश्य पडताळणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here