चंद्रपूर,दि.२१: Thackeray Group: महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलवा, अन्यथा राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, असा रोखठोक इशारा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या रवींद्र शिंदे यांनी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे, आ. ॲड.अभिजित वंजारी आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले या काँग्रेसच्याच चार आमदारांसमोर दिला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने मुख्य कार्यालयात आयोजित सहकार मेळावा व नवनिर्वाचित बाजार समिती सभापती व उपसभापती तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार कार्यक्रमात सहकारी पक्षाच्या बँक संचालकानेच इशारा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. अजित लाभे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, काँग्रेसचे पदाधिकारी, सहकार विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, घराबाहेर पडल्यानंतर आम्ही परत घरी जाणार की नाही, याची खात्री राहिलेली नाही. आज या जिल्ह्यातील वातावरण अतिशय गढूळ झाले आहे.
तीन तिघाडा काम बिघाडा करू नका | Thackeray Group
त्यामुळे काँग्रेसने लोकसभेचा उमेदवार बदलवा अन्यथा निवडणुकीत पराभव करूच. विशेष म्हणजे, शिंदेंचा इशारा काँग्रेसच्या या चारही आमदारांनी मुकसंमती असल्यागत ऐकून घेतला. अध्यक्षीय भाषणात वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष आगामी सर्व निवडणुकीत यश मिळविल्याशिवाय राहणार नाही. यश मिळाले नाही तर, राजकरण सोडून देऊ, निवडणुका जिंकण्यासाठी समन्वयाने काम करा, तीन तिघाडा काम बिघाडा करू नका. जिवाचे रान करू मात्र, जिल्हा परिषद, मध्यवर्ती बँक निवडणूक यासह इतर निवडणुकीत यश खेचून आणू, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तलाश हमारी थी भटक रहा था वो
‘‘तलाश हमारी थी, भटक रहा था वो, दिल हमने लगाया और धडक रहा वो, प्यार का तालुक भी अजब होता है, मोहब्बत हमारी थी ओर पी के झुम रहा था वो….”, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी स्वपक्षीय विरोधकांवर टीका केली. काँग्रेस पक्षात ‘चुगलचोट्टे’ खूप झाले आहेत, या चुगलचोट्ट्यांना कसे थांबवायचे यावर मार्ग काढा, असे आ. धोटे यांना सूचित केले. ‘रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर शोकसभेची वेळ येईल’ मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर ११ मे रोजी हल्ला झाला. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. रावत यांच्या हाताला गोळी चाटून गेल्याने ते थोडक्यात बचावले. एका इंचाचाही फरक पडला असता तर आजची सहकार सभा ही शोकसभा म्हणून घ्यावी लागली असती. सुदैवाने तसे झाले नाही. आता हा हल्ला करणाऱ्यांवरच शोकसभेची वेळ येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.