मुंबई,दि.10: भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल (दि.9) जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला. वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस दरीत कोसळली. त्यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच हल्ला करण्यात आला.
राजधानी दिल्लीत रविवारी (9 जून) मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा तीर्थक्षेत्रातून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांचा हाच गट राजौरी, पुंछ आणि रियासीच्या वरच्या भागांमध्ये लपून बसला आहे.