वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने गोणेवाडीत पोलिसाला चिरडले

0

सोलापूर,दि.२६ : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाने पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी
पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांचा खून केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोलनकर हे मंगळवेढा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ते शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता शिरसी ते गोणेवाडी मार्गावरून लोकअदालतीचे समन्स बजावण्यासाठी जात असताना शिरसी गावच्या शिवारातील हॅटसन डेअरीजवळ आले असता तेथून वाळू भरून बिगर नंबरचा पांढऱ्या रंगाचा इन्ट्रा व्ही. ३० टाटा कंपनीचा टेम्पो जात होता.

पोलीस कर्मचारी आपल्यावर कायदेशीर कारवाई करतील या भीतीपोटी चालकाने सोलनकर यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यांना गंभीर जखमी करून खून केल्याची फिर्याद गोणेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास मंगळवेढ्याच्या डीवायएसपी राजश्री पाटील या करीत आहेत.

घटनेत तिघे आरोपी असून हे तपकीर शेटफळ येथील असल्याची माहिती समोर येत असून त्यामध्ये एक अल्पवयीन असल्याचे समजते. मुजोर वाळू तस्करांनी खाकी वर्दीला न जुमानता चक्क अंगावर वाळूचे वाहन घालून जीवे मारल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सोलनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव बिलेवाडी (ता. सांगोला) हे आहे.

पोलीस शिपाई सोलनकर यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात संध्याकाळी करण्यात आला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व पोलीस कर्मचारी अंत्यविधीसाठी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here