मुंबई,दि.2: अभिनेत्री सुश्मिता सेनच्या चर्चित ‘ताली’ वेबसिरीजचा टीझर रिलीज झाला आहे. ही वेबसिरीज सत्यघटनेवर आधारित आहे. सुश्मिता सेन तिच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच तिच्या वैयक्तीक लाईफमुळे देखील चर्चेत असते. सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून तिच्या ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.यातील तिचा लूक पाहून चाहत्यांना या सिरीजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या येत्या 15 ऑगस्टला ताली ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामधील तिचा लूक, अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसीरिजच्या टीझरची सुरुवात गौरी सावंत यांच्या परिचयापासून होते. नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही कथा याच सर्व प्रवासाची आहे, असे यात पाहायला मिळत आहे. शिवाय गाली से ताली तक, स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला हे तिन्हीही हवं आहे, असे अनेक डायलॉग यात ऐकायला मिळत आहेत. सुश्मिता सेनचा अभिनय देखील लक्षवेधून घेत आहे. खूप दिवसांनी अभिनेत्री अशा तगड्या भूमिकेत दिसत आहे.या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे.
कोण आहे गौरी सावंत?
गौरी सावंत या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर इलेक्शन अँबेसिडर आहेत. काही वर्षांपूर्वीच त्या विक्स कंपनीच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आल्या होत्या. या जाहिरातीत त्या एका लहान मुलीसह दिसत होत्या. या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं की, त्या मुलीच्या आई- वडिलांचं निधन होतं आणि त्यानंतर गौरी सावंत तिला दत्तक घेतात. या जाहिरातीमुळे गौरी सावंत चर्चेत आल्या होत्या.
गौरी सावंत यांचा जन्म मुंबईच्या दादर येथील एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई- वडिलांनी त्यांचं नाव गणेशनंदन असं ठेवलं होतं. गौरी 7 वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांच्या आजीने त्यांना लहानाचं मोठं केलं. गौरी यांचे वडील एक पोलीस अधिकारी होते. गौरी यांना त्यांच्या सेक्शुअलिटीबाबत माहिती होती मात्र हे वडिलांना सांगण्याएवढी हिंमत त्यांच्याकडे नव्हती. शाळेत असताना मुलं गौरी यांची खिल्ली उडवत असत. हळूहळू त्या मुलांकडे आकर्षित होत होत्या. त्यावेळी त्यांना गे असण्याचा अर्थ काय हेसुद्धा माहीत नव्हतं. पण त्या गुपचूप आजीची साडी नेसत असत.
शाळेत असताना गौरी सावंत यांनी सगळी परिस्थिती जेमतेम सांभाळली मात्र जेव्हा त्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्या तेव्हा जास्त समस्या येऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबाने त्यांची सेक्शुअलिटी कधीच मान्य केली नाही. कुटुंबाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी गौरी यांनी घर सोडलं. त्यावेळी त्याचं वय 15 वर्षं होतं. नंतर त्यांनी वेजिनोप्लास्टी करून घेतली आणि गणेशनंदन ही ओळख पुसून त्या गौरी सावंत झाल्या.