नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा; नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट

0

मुंबई,दि.२८: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नितीन गडकरी यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याची चर्चा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज फाटक, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, गोविंद स्वरुप, दिग्विजय साने उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, निवडणुकीत लोकच मायबाप असतात ते निवडून देतात. मी आयुष्यात ठरविले की कोणाच्या गळ्यात हार टाकणार नाही. गेली ४० वर्षे कोणी माझ्या स्वागताला येत नाही. मी स्वत:चे कटआऊट लावत नाही, पोस्टर लावत नाही. कोणाला चहापाणी देत नाही. पुढच्या निवडणुकीतही मी तेच ठरविले आहे, मत द्यायचे तर द्या; पण  लोकांना मी माहिती आहे अन् ते मत देतात,  कारण त्यांनाही काम करणारी माणसे हवी असतात.

गडकरी म्हणाले, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महापालिका आणि नगरपालिकांची गुणवत्ता व कार्यपद्धती सुधारणे आणि त्या आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता, देशासाठी कसा होईल, टाकाऊपासून त्याचे रुपांतर संपत्तीत कसे होईल, यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमलात आणाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here