देवेंद्र फडणवीस कृष्ण नव्हे, धृतराष्ट्राची भूमिका निभावतायत: सुषमा अंधारे

0

दि.२०: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारतातील युद्धाचा दाखला देत राज्यातील राजकीय परिस्थिती उलगडून सांगितली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘कृष्ण’ तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘कर्ण’ असा केला. भ्रष्ट्राचाराविरोधातील लढाईत कृष्ण आणि कर्ण हे दोघेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर होण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही, असं विधान शेलार यांनी केलं.

यावरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. भारतीय जनता पार्टीचा इतिहास कच्चा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. शेलारांच्या विधानाचा समाचार घेताना अंधारे म्हणाल्या की, “या लोकांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांची पात्रांची निवड चुकलीय. कृष्णाचं पात्र फडणवीस रंगवत आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं की, “मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सध्या धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असा धृतराष्ट्र ज्याने आधी ढीगाने आरोप केले. पण आता सगळं कळत असूनही ‘बंद डोळे… बंद ओठ… बंद त्या पापण्या… आज प्रिये मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात” असं म्हणणारा हा धृतराष्ट्र आहे. ईडीने आरोप केलेले सर्व लोकं आता त्यांच्याकडे आहेत. पण धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. सगळ्यांना सामावून घेत आहे.”

“आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सर्व शकुनी आहेत, हे शकुनी असे आहेत, जे खरं काय आहे? ते सांगत नाहीत. हेच लोकं भावना गवळी आणि प्रताप सरनाईक यांना माफिया गँग बोलत होते. भावना गवळी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला राखी बांधायला जातात, ज्याने राज्यात भूकंप येऊ शकतो, हे माहीत असतानासुद्धा धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. धृतराष्ट्र हा सध्या हतबल आणि सत्तातुर आहे. तो सत्तेसाठी इतका हफाफलेला आहे की, त्याला न्याय काय? अन्याय काय? सत्य काय? आणि असत्य काय? या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. त्यामुळे फडणवीस मला कृष्ण नाही तर धृतराष्ट्र वाटतात” अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here