कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का: सुषमा अंधारे

0

जळगाव,दि.१: कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का? असे म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टीका केली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी व्यक्त केली. त्या मंगळवारी (१ नोव्हेंबर) महाप्रबोधन यात्रेसाठी जळगावात आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे. तुम्ही बॅनर पळवत आहात, पण बॅनर पळवल्याने काय होणार आहे. तुम्ही बॅनर पळवू शकता, शिवसैनिक पळवू शकता का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असलेली आपुलकी, आपलेपणा पळवू शकणार आहात का?”

“मला वाटतं गुलाबराव पाटलांनी असे छोटे-मोठे चिल्लर चाळे करू नये. नाहीतर कुठल्यातरी गाण्यासारखं लोकंच त्यांना विचारतील की, ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हणे तुम्ही गुवाहाटीला गेला, खोक्याबिक्याचा काही तरी कारभार केला’. अशी वेळ गुलाबराव पाटलांनी स्वतःवर येऊ देऊ नये,” असं सुषमा अंधारे यांनी खोचकपणे म्हटलं.

सुषमा अंधारे बंडखोर आमदारांवर बोलताना म्हणाल्या, “मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेचं नुकसान झालं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही.”

“पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते. बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत,” असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.

“लोकांना माहिती आहे, सत्ताधार्‍यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे. कारण, यामुळे त्यांना लोकांचे पाठबळ नाही,” असा घणाघातही अंधारे यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here