सुषमा अंधारे यांचा गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप

नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे

0

भंडारा,दि.4: शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा उल्लेख करत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी भंडारा जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेत संबोधित करताना आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांच्या सभांना गर्दी होत आहे. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली,” असे मोठे विधान सुषमा अंधारे यांनी केले.

जाहिरात

उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही: सुषमा अंधारे

“मी बीडमधील आहे, तर त्यांना वाटतं ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला

“उद्धव ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरून उतरत होते. ते बघून माझी आई रडत होती. एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला, असे माझी आई म्हणत होती. तेव्हाच मी उद्धव ठाकरे यांना साथ दिली पाहिजे, असे माझ्या मनात आले. आता आपण लढायचे ठरवले आहे,” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटातील कार्यकत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here