“तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी हा पक्ष…” सुप्रिया सुळे

0

मुंबई,दि.11: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणावर काल (दि.10) निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केला. दोन्ही गटाच्या आमदार पात्र झाले. राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाने पक्षाची दिलेली घटना मान्य नाही असे निकालात म्हटले आहे. ठाकरे गटाने 2018 ची घटना ग्राह्य धरावी अशी मागणी केली होती ती नार्वेकर यांनी अमान्य केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला आहे.

‘खोदा पहाड, निकला चुहा. डिसक्वालिफिकेशनची केस होती, मग सगळे पात्र कसे ठरले? मग लढाई कशावरून?. संविधानाचा अपमान आणि हत्या होताना दिसत आहे. या सरकारने पोरखेळ करून ठेवला आहे. पक्ष फोडा, घर फोडा. अनेक स्ट्रिक्चर पास केले आणि मग कुणीच अपात्र नाही, मग ही केस केलीच कशाला?’, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र केले असते तर…

‘सरकार कनफ्यूज आहे, यात सर्व्हेचाही रोल असेल. उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र केले असते तर नाचक्की झाली असती, म्हणून तर यांनी त्यांना पात्र केलं का? असा सवाल आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ट्रिपल इंजिनचं हे खोके सरकार मान्य नाही. महाराष्ट्रात घडलेला प्रकार हे गलिच्छ राजकारण आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून हे सगळे आले. हा उद्धवजींचा विजय आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘निर्णय अदृष्य शक्तींनी ड्राफ्ट केला का? कारण त्यांनी तो इंग्रजीमध्ये वाचला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात निर्णय घेताना इंग्रजीमध्ये वाचायचं कारण काय? लिहून आलेलं त्यांनी फक्त इंग्रजीमध्ये वाचलं का? हा सगळा निर्णय मराठीमध्ये का वाचला गेला नाही? कदाचित अदृष्य शक्तींनी तो इंग्रजीमध्ये लिहिला असावा’, अशी शंका सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी हा पक्ष…

‘तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींना दिला. यांनीच उद्धव ठाकरेंना नेता मानलं, हे सगळे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या बॅनरवर हे आमदार झाले. भाजपचं महाराष्ट्राविरोधात हे षडयंत्र आहे. 200 आमदार असूनही अस्थिर वातावरण आहे. या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध करते’, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here