Supreme Court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला केनियाचे सरन्यायाधीश उपस्थित

0

नवी दिल्ली,दि.14: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षात एकापेक्षा एक तगडे युक्तिवाद मांडले जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशा या खटल्याची सुनवाणी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला केनियाचे सरन्यायाधीश उपस्थित

महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंतीचं हे प्रकरण फक्त राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी दिशादर्शक असल्याचं म्हटलं जात आहे. आता तर इतर देशांचंही याप्रकरणाकडे लक्ष लागून राहिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण शिवसेनेच्या सुनावणीवेळी आज सुप्रीम कोर्टात केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांच्या वकिलांच्या टीमनं आवर्जुन उपस्थिती लावली.

आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची घटना घडली. सकाळच्या वेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळले, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. दुपारी लंचब्रेक झाला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरु केला, एवढ्यात सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री झाली. विशेष म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D. Y. Chandrachud) यांनी कोर्टातील मान्यवरांना स्वतः त्यांची ओळख करून दिली.

केनियाच्या सरन्यायाधीश मार्था के. कोमे त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आज भारताच्या सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याचं कामकाज पाहण्यासाठी पाहुणे म्हणून कोर्टरुममध्ये उपस्थित आहेत. आज सुप्रीम कोर्टाच्या लंच ब्रेकनंतर केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांची टीम कोर्टरुममध्ये अगदी पहिल्या बेंचवर बसून संपूर्ण कामकाज पाहत होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केनियाच्या सरन्यायाधीशांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत देखील केलं. तसंच केनियाचे सरन्यायाधीश मार्था करंबू कोमे (Martha Koome) यांची ओळख करुन दिली. 

“केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था करंबू कोमे या आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत याचा आम्हाला खूप सन्मान वाटतो. त्या केनियाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत”, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. तसंच त्या उच्च शिक्षित असून त्यांनी भारतातील घटनात्मक कायद्याशी संबंधित मुद्द्यांसह विस्तृतपणे लिखाण केलं आहे. त्यांनी अलीकडेच केनियामध्ये मूलभूत संरचना सिद्धांत किती प्रमाणात लागू होईल यावर निर्णय दिला होता, असंही चंद्रचूड यांनी सांगितलं. 

शिवसेनेच्या केसची दिली संक्षिप्त माहिती अन् मिश्किल हसले

भारतातील कोर्टरुमचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या केनियाच्या शिष्टमंडळाला यावेळी चंद्रचूड यांनी स्वत: शिवसेनेच्या संदर्भातील खटल्याची माहिती संक्षिप्त स्वरुपात दिली. तसंच सध्या नेमकं कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद सुरू आहे याचीही माहिती चंद्रचूड यांनी केनियाच्या सरन्यायाधीशांना दिली.

सरन्यायाधीश मार्था कोमे यांना चेंबरमध्ये शिवसेनेच्या खटल्याबाबत संक्षिप्त माहिती देण्यात वेळ गेल्या त्यामुळे लंच ब्रेकनंतर यायला 10 मिनिटं उशीर झाला असं कोर्टरुमला सांगताना चंद्रचूड मिश्किल हसले. “प्रकरण किती गुंतागुंतीचं आहे आणि आपण कोणत्या प्रकरणावर वाद घालत आहोत याचा शक्य होईल तितक्या संक्षिप्त पद्धतीनं मी त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे”, असं चंद्रचूड मिश्किल हास्य करत म्हणाले. यानंतर कोर्टरुममध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर काहीकाळ स्मितहास्य पाहायला मिळालं. यावेळी सर्व उपस्थितांनी केनियाच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here