नोकरी इच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची पर्वणी
सोलापूर,दि.9: राज्यात उद्योग व्यवसाय पुर्ववत सुरु झाल्याने रोजगाराच्या (Employment Opportunities) मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी (Employment Opportunities) उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने दिनांक 12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सदर रोजगार मेळावा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव (Sachin Jadhav, Assistant Commissioner, Skill Development, Employment and Entrepreneurship) यांनी दिली आहे.
राज्यातील नोकरी इच्छुक (Job Seekers) उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग व व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायरॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., पिआयाजो व्हेकल्स, धूत ट्रान्समिशन आदी नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात विविध प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत.
या मेळाव्यात सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी,आय.टी.आय, डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
तरी नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहनही सहायक आयुक्त, जाधव यांनी केले आहे.
याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थ कोट), पार्क चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.