राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची महत्वाची माहिती ‘तर निवडणूक…’

0

मुंबई,दि.25: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. अशातच लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरू शकतो.

मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक मतदार संघात 300 ते 400 जणांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे झाले तर निवडणूक आयोगा समोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. एस. चोक्कलिंगम यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे यांच्या समर्थक आंदोलकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा केला जातोय. असं झाल्यास निवडणूक आयोगावर ताण पडू शकतो का? असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचं काम पूर्ण करु. EVM ची कपॅसिटी 300 उमेदवारांची आहे. 300च्या वर जर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार”, अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मांडली.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर – 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदारांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकूण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

10 – नागपूर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकूण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.

11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकूण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.

12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकूण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

13-चंद्रपूर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकूण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here