एसटी कर्मचारी आक्रमक; शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक

0

मुंबई,दि.8: एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक केली आहे. एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे विलीनीकरण मागणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महामंडळाने कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले.

दरम्यान, सरकारवर कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं असल्याची प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here