“कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है” मनसेने फोटो केला शेअर

0

दि.24: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील सभेत अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले. अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. यानंतर राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याआधी शऱद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे.

राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले

अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते. तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता. ससेमिरा मागे लावण्यात आला असता. हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here