सोलापूर,दि.२२: सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.२०) झाली. या सभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून आठ जणांना भाजपने संधी दिली आहे. स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे १४ तर शिवसेना आणि एमआयएम पक्षाचे प्रत्येकी एक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थायी समिती सदस्यांच्या निवडीनंतर आता कोण होणार सभापती? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर विनायक कोंड्याल हे पद्मशाली समाजाचे तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या मराठा समाजातील आहेत तर सभागृह नेते नरेंद्र काळे हे धनगर समाजातील आहेत. आता स्थायी समिती सभापती पदासाठी लिंगायत समाजातील सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
लिंगायत समाजातील नगरसेवक डॅा. किरण देशमुख आणि नगरसेविका रंजीता चाकोते यांची नावे स्थायी समिती सभापती पदासाठी चर्चेत आहेत. डॅा. किरण देशमुख हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर रंजीता चाकोते या प्रथमच निवडून आल्या आहेत. रंजीता चाकोते या काँग्रेस घराण्याशी जोडलेल्या चाकोते परिवारातील आहेत. चाकोते परिवारातील महिला भाजपा पदाधिकारी आहेत. डॅाक्टर असणारे किरण देशमुख हे शांत आणि संयमी आहेत. त्यांच्या रूपाने लिंगायत समाजाला स्थायी समिती सभापतीपद मिळू शकते.








