सोलापूर,दि.3: सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील उडगी गावात कर्नाटकचे झेंडे फडकवण्यात आले आहेत. अनेक गावात रस्ता, पाणी आणि वीज या सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक वाद (Maharashtra Karnataka Dispute) सुरू आहे. हा वाद अधिकच वाढला आहे. आता सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे फडकवत कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News) उडगी ग्रामस्थांनी गळ्यात कर्नाटकचे उपरणे आणि कर्नाटकचा झेंडा हातात घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने 75 वर्षात आम्हाला रस्ते, वीज आणि पाणी या मुलभूत सुविधा देखील पुरवल्या नाहीत. मात्र कर्नाटक सरकार आमच्या शेजारील कर्नाटकातील गावांना सर्व सुविधा पुरवते. त्यामुळे सुविधा द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटकात सामील होण्यासाठी परवानगी द्या, अशा इशारा अक्कलकोट तालुक्यातील उडगी ग्रामस्थांनी दिला आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा इशारा दिला आहे. जत तालुक्यातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांनी वारंवार राज्य शासनाकडे पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न न सुटल्याने गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी सोलापूर व अक्कलकोटवर दावा सांगितला आहे. बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर सीमावाद आणखी चिघळला. अशातच काल (दि.2) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देऊ नये असे आवाहन केले आहे.