सोलापूर आयटी पार्क करिता जागेची रोअर मशीन व ड्रोनद्वारे मोजणी 

0

सोलापूर,दि.३: आयटी पार्कसाठी (Solapur IT Park) प्रशासनाकडून सध्या जागेचा शोध सुरू असून मंगळवारी होटगी तलावा शेजारील सुमारे ७०० एकर जागेची रोअर मशीन तसेच ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली. यात सुमारे ८५ एकर जागा एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोलापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जागा शोधा अशा सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जागेची शोध मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी काही ठिकाणच्या जागा पाहिल्यानंतर मंगळवारी होटगी तलावा नजीक असलेल्या जागेची रोअर मशीन आणि ड्रोन दारे मोजणी करण्यात आली.

या मोजणीत ८५ एकर जागा एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे समोर आल्यानंतर जलसंपदा विभागाने ही जागा एमआयडीसीला सुपूर्द केलीअसून या जागेवर वेअर हाऊस प्रस्तावित असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेआठ वाजता मोजणीला सुरुवात झाली. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ती सुरू होती. मोजणीचा नकाशा बुधवारी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी होटगी मंडलाधिकारी अश्विनी दराडे, मुस्तीचे मंडलाधिकारी रियाज भाईजान, तलाठी शेखर शेड्याल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळ परिसरातील पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील उपलब्ध शासकीय जागांची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना महसूल, जलसंपदा, कृषी व वन विभागांना दिल्या आहेत. पुढील दोन–तीन दिवसांत सर्व तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here