सोलापूर जिल्ह्यातील या ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश

0

सोलापूर,दि.१४: मनाई आदेश: श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रुप, अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण, वळसंग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिनांक १३ जूनपासून अनिश्चित कालावधीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

मनाई आदेश

अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केला आहे.

वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक कारण / सेवा, धार्मिक कारण वगळता ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणे, पेट्रोल पंप धारकांना बाटलीमध्ये सुटे डिझेल, पेट्रोल विक्री करणे, धरणे, मोर्चे, निदर्शने अशी कोणत्याही प्रकारची आंदोलने करणे, ज्वालाग्राही पदार्थ विनाकारण बाळगणे या बाबींना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, अशा व्यक्ती विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here