क्रिप्टोकरेंसी क्षेत्रात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे सोलापूर सायबर पोलिसांचे आवाहन

0

सोलापूर, दि.10: क्रिप्टोकरेंसी (Cryptocurrency) क्षेत्रात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे सोलापूर सायबर पोलिसांनी (Solapur Cyber Police) आवाहन केले आहे. वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्र प्रभावित तसेच वेगवान झाले असून वित्तीय क्षेत्र हे आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या क्षेत्रापैकी एक होय. मागील काही वर्षांपासून आभासी चलन ( क्रिप्टोकरन्सी ) ही संकल्पना मूळ धरु लागली असून वेगाने प्रसार पावत आहे. याची सुरुवात २००९ मध्ये बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी पासून झाली असून आज इंटरनेटवरती हजारो क्रिप्टोकरन्सी खरेदी – विक्री साठी उपलब्ध आहेत.

त्यातच मागील काही वर्षांपासून यामध्ये केलेल्या गुंतवणूकीवरती अनपेक्षित असा प्रचंड मोठा परतावा मिळाला असल्याने यामध्ये गुंतवणूकीचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी मोबाईल ॲप्लीकेशन – विविध वेबसाईट उपलब्ध आहेत. कमी वेळात अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी वित्तीय संगणक माहितीगारांसोबतच सर्वसामान्य ज्यांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही तेही यामध्ये गुंतवणूक करत आहेत. हव्यासापोटी पुरेशी माहिती न घेता ही जोखीम पत्करणाऱ्यांकडे सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा वळवला असून क्रिप्टोकरन्सी संबंधाने होणाऱ्या फसवणूकीमध्ये वाढ होताना दिसत आहे.

फसवे मोबाईल ॲप्लीकेशन्स, फसव्या वेबसाईटचा वापर करुन सर्रासपणे फसवणूक केली जाते. यासाठी अतिशय कमी मुदतीत ( जसे एक दिवस ) मोठा परवाना ( २० टक्क्यांहूनही अधिक ) परतावा देण्याचे आमिष दाखवणारे ईमेल, sms, टेलीग्राम – व्हॉट्सॲप संदेश पाठवले जातात, ज्यासोबत एक लिंक पाठवली जाते. ही लिंक एखाद्या वेबसाईट वरती घेवून जाते किंवा एखादे ॲप डाउनलोड करते. त्यानंतर यामध्ये आपल्याला रक्कम गुंतवण्यासाठी सांगितली जाते.

वेबसाईटचे बाबतीत सुरुवातीला खात्री करण्यासाठी बऱ्याचदा वापरकर्ता थोडीशी रक्कम जमा करतो. अशा वेळी त्याला मुदतीत परतावा देखील मिळतो. त्यानंतर मग हाच वापरकर्ता अधिक मोठा परतावा मिळावा म्हणून मोठी रक्कम जमा करतो परंतु त्याला परतावा किंवा मुद्दल दोन्ही मिळत नाही. पुढे त्याला जीएसटी सर्विस चार्जेस, प्रोसेसिंग फी, वॉलेट कॅपॅसिटी वाढवण्यासाठीची फी अशी अनेक कारणे सांगून पैसे वसूल केले जातात व त्याची संपूर्ण फसवणूक होते. मोबाईल ॲप्लीकेशन्सच्या बाबतीत लिंक पाठवून मोबाईल ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाते व त्यावर गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जाते.

अशावेळी वापरकर्ता हे ॲप्लीकेशन डाउनलोड करतो व रक्कम गुंतवतो. ऑटोमेटेड सिस्टिमचा वापर करुन त्याने गुंतवलेल्या क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढत असून त्याला आणखी रक्कम गुंतवण्यासाठी सांगितले जाते. अधिक रकमेच्या हव्यासापोटी मग वापरकर्ताही आणखीन रक्कम जमा करतो. परंतु ज्यावेळी तो ही रक्कम withdraw करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्यालाही वरप्रमाणेच विविध कारणे सांगून आणखी रक्कम जमा करण्यासाठी सांगून त्याची फसवणूक होते. बिटकॉईन, इथरम इ. सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये अतिशय काळजीपूर्वक व परिपूर्ण माहिती घेऊन मगच गुंतवणूक करावी. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

त्याचबरोबर प्रलोभनास बळी न पडता गुंतवणूकीसाठी यासंबंधातील विश्वासहार्य मोबाईल ॲप्लीकेशन्स व वेबसाईटचा वापर करावा. फसवणूकीचा प्रकार आढळल्यास सायबर सेलला तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी. असे आवाहन सय्यद शौकत अली, वपोनि सायबर पो. ठा. सोलापूर शहर यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here