सोलापूर,दि.३१: क्रेनची रोप वायर ही जुनी झालेली असताना देखील ती न बदलता तसेच खोदकाम चालू ठेवून निष्काळजीपणाने व हयगय केल्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपातून महादेव गणपत बरकडे याची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी की आरोपी क्रेन ऑपरेटर महादेव गणपत बरकडे तसेच क्रेन मालक सागर शिवाजी गव्हाणे यांनी दिनांक ३१.०५.२०१९ रोजी दुपारी ०१:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे ढोक बाभुळगांव, ता. मोहोळ येथील शेतजमीन गट नं. ३९ चा मालक सागर शिवाजी गव्हाणे यांचे शेतातील विहिरीचे क्रेनच्या सहाय्याने खोदकाम चालू असताना क्रेनची रोप वायर ही जुनी झाली आहे हे माहित असताना देखील ती न बदलता तसेच खोदकाम सुरू ठेवले.
सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता
खोदकाम सुरू ठेवून निष्काळजीपणाने व हयगय केल्यामुळे आरोपी सागर शिवाजी गव्हाणे हा स्वतः स्वतःचे मरणास व बापूसाहेब नागनाथ जाधव यांचे मरणास तसेच ऋषिकेश नागनाथ माने यास जखमी होण्यास कारणीभूत झाल्याच्या खटल्यातून कोणताही सबळ पुरावा कोर्टासमोर न आल्यामुळे, आरोपी महादेव गणपत बरकडे याची सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपींतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. युवराज आवताडे, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे यांनी काम पाहिले.








