सोलापूर,दि.3: सोलापुरात भाजपाच्या दोन गटात जोरदार राडा झाला असून त्यात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे असे मृत मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवारीवरून भाजपाच्याच दोन गटात वाद झाला. भाजपाने प्रभाग क्रमांक 2 मधून शालन शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्याच प्रभागातून ईच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल (दि.2) उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता.
प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून भाजपा नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होत. त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जात होता असा आरोप मनसेचे प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळासाहेब सरवदे हे रेखा सरवदे यांचे नातेवाईक आहेत. ते मध्यस्थीसाठी पोहोचले होते. मात्र त्याचवेळी शिंदे परिवाराच्या लोकांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भाजपा उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शालन शिंदे यांनी मयत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतला, असं फिर्यादीत म्हटलं आहे.








