सोलापूर,दि.११: सोलापूर महानगरपालिकेने बेकायदा अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. अवंती नगर आणि निराळे वस्ती परिसरातील नाल्यावर अतिक्रमण असलेले अकरा खोके जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. यावेळी इतर साहित्यही जप्त करण्यात आले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहरातील नाल्यावरील अतिक्रमणामुळे अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. नाल्यावर अतिक्रमण असल्याने पाण्याचा प्रवाह व्यवस्थित पुढे गेला नाही. त्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसला. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज शुक्रवारी दोन सत्रात ही मोहीम राबविण्यात आली. सकाळी अवंती नगर येथील नाल्यावरील खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. या मोहिमेत पाच खोके निष्काशीत करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी
निराळे वस्ती येथील नाल्यावरील खोक्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सहा लोखंडी खोके जागेवरच निष्काशीत करण्यात आले. ही कारवाई पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी हेमंतकुमार डोंगरे यांच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, दीपक कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने ही मोहीम राबविण्यात आली.








