वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत

0

मुंबई,दि.१८: वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे.

राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल.

मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

सध्याच्या पद्धतीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रिडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहेमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल.

अचानक रात्री वीज खंडीत होणार नाही

प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here