सोलापूर येथे प्रवासी जीपचा अपघातात सहा जणांचा मृत्यू, गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर साधला निशाणा

0

सोलापूर,दि.17: अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळील गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर प्रवासी जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोटहून सोलापूरला येत असताना हा अपघात मंगळवारी (दि.16) साडेदहाच्या सुमारास घडला.

एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून संप सुरू आहे. संपाला पाठींबा देत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खासगी वाहनाने अवघडतेनं प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी सोलापूर-अक्कलकोट मार्गावर खासगी वाहनाचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. त्यावरुन, गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारच्या हेकेखोर धोरणामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही. मंगळवारी अक्कलकोट-सोलापूर या महामार्गावरुन खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांनी आपला जीव गमावला. परंतु हा अपघात नसून राज्य सरकारने केलेले खून आहेत. नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करायला प्रवृत्त करणारे राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत यांच्यासोबत आझाद मैदान पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here