Pankaj Udhas: ‘चिठ्ठी आयी है’ गाणारे गायक पंकज उधास यांचे निधन

0

मुंबई,दि.26: दिग्गज गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांची मुलगी नायब उधास हिने गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. 

पंकज उधास यांच्या पीआरने सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता गायकाचा मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गायकाच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. पंकजसारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण डोळ्यात अश्रू आणत गायकाला अखेरची श्रद्धांजली वाहतो आहे. 

पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते, जे हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉपमधील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले. १९८० मध्ये ‘आहत’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर  १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली.२००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा  भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here