दि.१: Singer KK Death: प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने चर्चांना तोंड फुटलं आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय. आज केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भातील तपास होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.
३१ मे रोजी केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. तो ५४ वर्षांचा होता. केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या सुत्रांनी केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत. आज कोलकात्यामधील सएसएकेएम रुग्णालयामध्ये केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. पोलीस ग्रॅण्ड हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहेत. तसेच ते या हॉटेलमधील कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चौकशी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. त्यांची गाणी ही सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये लोकप्रिय ठरली. त्या सर्व वयोगटातील व्यक्तींच्या भावनांचे प्रतिबिंब होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम राहिल. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्याप्रती मी दु:ख व्यक्त करतो. ओम शांती”, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
“के.के.च्या दुःखद निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. हे आपलंच नुकसान आहे. ओम शांती”, असे म्हणत अभिनेता अक्षय कुमारने त्याला श्रद्धांजली वाहिली.