सोलापूर,दि.२२: सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेले पोलिस हवालदार भागवत शिंदे यांना राष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत रौप्य तर त्यांची मुलगी प्रगती शिंदेला राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य व सुवर्णपदक मिळाले. प्रगतीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे कबड्डीच्या मास्टर गेम झाल्या. या स्पर्धेत शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकावित रौप्य पदक मिळविले. त्यांना मुंबई येथील प्रशिक्षक दुर्वास धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. तर भागवत शिंदे यांची मुलगी प्रगती शिंदे हिने उस्मानाबाद येथे झालेल्या १४ वर्षाखालील शालेय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य व सांघिक सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीवर प्रगती शिंदे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. प्रगती हिने ६० मीटरमध्ये व ओव्हर ऑलमध्ये रौप्य व सांधिक सुवर्ण पदक मिळविले. प्रगतीला क्रिडा शिक्षक प्रसन्नजीत सूर्यवंशी, लिटर फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका एस. आर. सिलिन यांचे मार्गदर्शन लाभले. दोघांच्या यशासाठी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, अजित बोहाडे, डॉ. दिपाली काळे यांनी अभिनंदन केले.