शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली ही मागणी

0

दि.12: शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याची मागणी सर्व खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली, असं नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदार भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होतेय, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं मत बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केलं. त्यानंतर  उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

विकासकामे करायची आहेत. दोन वर्षे उरली आहेत, त्यामुळे नैसर्गिक युती करा. एकनाथ शिंदे यांना स्वीकारा, अशी मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली, असं हेमंत गोडसे यांनी सांगितलं. तसंच एकनाथ शिंदे यांना पक्षात घेण्यासंदर्भात वारंवार विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, “25 वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी अनुभव वेगळा आहे. 25 वर्ष नैसर्गिक युती होती मात्र अडीच वर्षात अनेक प्रकल्प रखडले,” असं हेमंत गोडसे म्हणाले.

दरम्यान, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये काहीही करा पण भाजपसोबत चला. आपण भाजपसोबत गेलो नाही तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळ्यांनाच बसेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाजप हाच आपला नैसर्गिक मित्र असून काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्याला कधीही साथ देणार नाहीत, असे समर्थन बहुतेक खासदारांनी केले.असा आग्रह शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सन्मानाने परत घ्या, यावरही खासदारांनी जोर लावला, अशी माहिती समोर येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here