Shivraj Patil Chakurkar: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी जिहाद वादावर स्पष्ट केली भूमिका

0

नवी दिल्ली,दि.21: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी जिहाद वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil Chakurkar) यांनी वादग्रस्त विधान केलं होते. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केलं होते. शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादसोबत केल्याचा दावा करत राजकीय वाद निर्माण झाला. गुरुवारी केलेल्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे म्हटले. आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते, असेही त्यांनी म्हटले.

शिवराज पाटील यांनी म्हटले की, चांगल्या गोष्टींसाठी, माणसाच्या संरक्षणासाठी कोणी शस्त्र उचलले तर त्याला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केले त्याला जिहाद असे म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितले. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये, धार्मिक ग्रंथात असल्याचे त्यांनी म्हटले.

जिहादबाबत बोलताना शिवराज पाटील यांनी म्हटले की, तुम्ही कुराण वाचले का? कुराणानुसार, देव एक आहे. त्याला रंगरुप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्येदेखील असेच म्हटले जाते. हिंदूच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याच त्यांनी म्हटले. लढाई, युद्ध सगळ्या देशांमध्ये आहे. महाभारत, रामायणात युद्ध आहे. पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध झाले. युद्ध तुम्हाला काही प्रमाणात काही करावे लागते, असेही त्यांनी सांगितले. वेळेप्रसंगी युद्ध करावेच लागते.

जिहाद आणि युद्धाची संकल्पना वेगळी असल्याचे शिवराज पाटील यांनी स्पष्ट करताना सांगितले की, जिहाद म्हणजे स्वार्थासाठी केलेले युद्ध आहे. तर, युद्ध हे संरक्षणासाठी, योग्य कारणांसाठी केले जाते. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले की, तू लढ, कर्तव्यापासून दूर पळून न जाण्यास सांगितले, याला तुम्ही जिहाद म्हणणार का, असा उलट प्रश्न त्यांनी केला.

सरसंघचालकही भाष्य करणार नाहीत

शिवराज पाटील यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा माझ्या या विधानावर अद्याप बोलले नाहीत. ते बोलतील असं वाटत नाही. मला काय म्हणायचे आहे, ते आधी समजून घेतील. गावातील भाजपचे नेते काय बोलतात याला महत्त्व देत नसल्याचे पाटील यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here