सोलापूर,दि.४: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथी निमित्त (स्मृतिदिन), सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानाचा मुजरा केला.
शौर्य, धैर्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि जनसामान्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. शिवरायांचे संपूर्ण जीवन आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
अभिवादन सोहळ्याचा तपशील:
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, शिवछत्रपती रंगभवन येथील पुतळ्याची वर्षानुवर्षे निष्ठेने देखभाल करणारे राम जगदाळे यांच्या हस्ते महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
या अभिवादन कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, मैनाताई साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा सचिव लखन पारसे, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे यांच्यासह समीर शेख, राहुल जाधव, बालाजी जगदाळे, कुमार जगदाळे, रेवण खजूरकर व अन्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







