Sharad Pawar On Presidential Election: शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? शरद पवारांनी भूमिका केली स्पष्ट

0

दि.14: Sharad Pawar On Presidential Election: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं.

राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असं जाहीर केल्यानंतर हे विधान समोर आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे आपचे संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता. आपने शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here