कोल्हापूर,दि.३: Sharad Pawar On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा घेतली. महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची सार्वजनिक सभा झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. १९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले. “जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “बरेच महिने हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही. ”
” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी मागील पाच -सात वर्षांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधुकरराव पिचड हे नेते होते. भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि एवढा काळ एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना, त्यांना संधी द्यावी. त्यातून ही निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.”