नागपूर,दि.15: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकार विषयी सूचक विधान केले आहे. सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शरद पवारांनी यावेळी श्रीलंकेत सुरु असलेल्या आंदोलनाचा दाखलाही दिला. आज देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली जात आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
“देशाचं राजकारण ज्यांच्या हातात आहे त्यांनी सत्ता केंद्रीत केली असून त्याच्या जोरावर विरोधी आवाज बंद पाडायचं हे सूत्र हाती घेतलं आहे. मध्य प्रदेशमध्येही आपण काय झालं हे पाहिलं. कर्नाटकमधील सरकारही याचप्रमाणे पाडण्यात आलं. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी घेऊन चांगलं चाललेलं सरकार सत्तेला बाजूला करण्याचा निर्णय दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी घेतला,” असा आरोप शरद पवार यांनी केला.
“आम्ही सांगतो त्या पद्दतीने कारभार करा, आम्ही सांगतो ती विचारधारा स्विकारा असं सांगितलं जात आहे. अन्यथा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आले असले तरी घालव्याशिवाय राहणार नाही. हेच काम दिल्लीच्या नेतृत्वाने केलं आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली.
“आज ठिकठिकाणी ही उदाहऱणं पहायला मिळत आहेत. अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे. पण कितीही केलं तरी या गोष्टी टिकत नसतात. कारण सत्तेचा दोष असतो, तो म्हणजे सत्ता केंद्रीत झाली की ती भ्रष्ट होते. आज देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं.
“दिल्लीत अनेकदा खासदार संसदेतून सभात्याग केल्यानंतर गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करतात किंवा शांत बसून निषेध नोंदवतात. हा लोकशाहीचा अधिकार आहे. सभागृहात तुम्ही काही ऐकत नसाल आणि त्यामुळे सभात्याग करत बाहेर जाऊन शांत बसणे हा गुन्हा नाही. पण आदेशात गांधींचा पुतळा आणि संसदेत कोणी घोषणा द्यायच्या नाहीत, बसायचं नाही, आंदोलन करायचं नाही असं सांगण्यात आलं आहे. लोकशाहीत व्यक्त होण्याचे हे साधे मार्ग आहेत,” असं शरद पवार म्हणाले.
“याचा अर्थ सगळी सत्ता आमच्या हातात केंद्रीत ठरवणार आणि त्यादृष्टीने देश चालवणार असा आहे. पण या अशा गोष्टी टिकत नसतात. श्रीलंकेत आज काय चित्र दिसत आहे. श्रीलंकेत एका कुटुंबाकडे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणपद होतं. सत्ता केंद्रीत झाली होती. केंद्रीत झालेली सत्ता हवी तशी आम्ही वापरणार. कोणी विरोध केला तर तुरुंगात टाकणार अशा गोष्टी झाल्या. आज तिथे राष्ट्रपतींच्या घरात घुसून संघर्ष केला जात आहे. घराणं देश सोडून बाहेर गेलं आहे. रस्त्यावर लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. कारण सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते. लोक आवाज उठवत असतात आणि श्रीलंकेत घडलेलं सगळं जग पाहत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“पहिल्या दिवसापासून सरकार घालवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यामध्ये आपल्या दोन नेत्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागली. अनिल देशमुखांचं काम उत्तम होतं. पण जुन्या शिक्षणसंस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं निमित्त करुन त्यांच्यावर खोटे खटले टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर केला असता आणि त्यासाठी कारवाई झाली असती तर समजू शकतो. दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्यावरही तीच वेळ आली. नवाब मलिक मांडणाऱ्या भूमिकेकडे देशाचं लक्ष असायचं. दिल्लीत संसदेतही काही सरकारी नवाब मलिक आज काय म्हणाले असं विचारायचे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे सहन झालं नाही, आणि त्यांच्यावर जुन्या केसमध्ये कारवाई करत आपल्यापासून बाजूला केलं,” असा आरोप शरद पवारांनी केला.